बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

भूगोल विभाग – दाते कॉलेज मध्ये Group Discussion आणि प्रात्यक्षिकाद्वारे भुगोलाचे प्रशिक्षण

सत्र 2021-22 मधे भूगोल विभागाच्या 10-10 विद्यार्थ्यांचे गृप तयार करण्यात आले. प्रत्येक गृप मधील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमावर आधारित अनेक भौगोलिक संकल्पना स्पष्ट करणारे विविध चार्ट्स आणि मॉडेल्स तयार केले. तसेच या सर्व विद्यार्थ्यांचे Group Discussion घेण्यात आले.
यामध्ये BA – Sem II, Sem lV, Sem Vl या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अशा उपक्रमामुळे अभ्यासक्रमातील अनेक विषयांची तयारी होते. विद्यार्थी मिळून मिसळून अतिशय उत्साहाने सहभागी होतात. त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. आणि त्यांच्या संबंधित विषयातील काही अडचणी असतील तर त्या चर्चेतून समजाऊन सांगता येतात.
हा उपक्रम राबविण्या करीता 10 दिवसांचा कालावधी देण्यात आला. आणि दि. 19/5/2022 ते 20(5/2022 या कालावधित Group Discussion घेण्यात आले.

दाते कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रयासवन येथे श्रमदान

भूगोल विभागाने प्रयास सोबत केलेल्या MOU अंतर्गत रविवार दि. 8/5/2022 रोजी सकाळी 6 वाजता भूगोल विभागाचे 52 विद्यार्थी, प्रयासवन येथे श्रमदान मोहीमेत सहभागी झाले. झाडांना आळे करून ठिबक सिंचनाची सुविधा व्यवस्थित कार्यरत आहे, याची खात्री करून घेतली. दोन तास श्रमदान करून सहकार्य केले. गेली चार वर्ष भूगोल विभाग प्रयास सामजिक संघटने सोबत जोडले गेले आहे. सोबत भूगोल विभाग प्रमुख डॉ. कल्पना देशमुख व सहकारी प्राध्यापक प्रकाश जुमनाके सहभागी झाले.

BA IIl SEM VI या वर्गाच्या Field Survey चे आयोजन

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार शुक्रवार दि. 6/5/2022 रोजी भूगोल विभागाने BA IIl SEM VI या वर्गाच्या Field Survey चे आयोजन केले. 2021-22 या सत्रातील हा सर्वे मातोश्री वृद्धाश्रम गोधनी, यवतमाळ. येथे आयोजित करण्यात आला. या सर्वेक्षणात BA Sem Vl या वर्गाचे 46 विद्यार्थी सहभागी झाले.
या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांनी सर्व वृद्धांच्या खोल्यांची व बाजूच्या परिसराची स्वच्छता केली. वृद्धाश्रमातील वृद्धांच्या मुलाखती घेऊन, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, अडचणी, त्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
सर्व विद्यार्थ्यांनी मिळून वृध्दांना आवश्यक वस्तूंचे वाटप केले. या सर्वेक्षणात संपूर्ण पार्श्वभूमीवर आधारीत अभ्यासपूर्ण अहवाल लेखन करून भूगोल विभागात सादर केला जातो.
विद्यार्थ्यांसोबत भूगोल विभाग प्रमुख डॉ. कल्पना देशमुख आणि सहकारी प्राध्यापक प्रकाश जुमनके सहभागी झाले.

दाते कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रयासवन येथे श्रमदान

रविवार दि. 9/1/2022 रोजी सकाळी भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून 'प्रयास वन ' या प्रकल्पात, झाडांना आळे करणे, गवत काढणे, ड्रीप एरिगेशन ची व्यवस्था नीट कार्यरत होते आहे की नाही हे काम करून परिसर स्वच्छता केली.

विद्यार्थ्यांनी PPT च्या माध्यमाने सेमिनार सादर

3 व 4 जानेवारी 2022 रोजी B.A. Sem V च्या भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी PPT च्या माध्यमाने सेमिनार सादर केले.

दाते कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रयासवन येथे श्रमदान

रविवार दि.2/1/2022 रोजी सकाळी भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रयासवन येथे श्रमदान केले. परिसर स्वच्छ केला व रोपे लावण्यात आली.

दाते कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम

दरवर्षी महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांकडे, भूगोल विभागातील BA lll या वर्गातील विद्यार्थी घरोघरी जाऊन बोअरवेलच्या पाण्याचे नमुने गोळा करतात. भूगोल विभागाकडून हे पाण्याचे नमुने यवमाळमधील अनुजिवशस्त्र पाणीपरिक्षण प्रयोगशाळा, येथे परीक्षणा करीता पाठविले जातात. आणि हे पाणीपरीक्षणाचे रिपोर्ट त्या लोकांना देऊन, त्यांच्या बोअरचे पाणी पिण्यायोग्य आहे अथवा नाही हे त्यांना सांगितले जाते. त्यानुसार या वर्षीही हा उपक्रम २-१-२०२१ रोजी राबविण्यात आला. परिसरातील रहिवाश्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

दि. 27/12/2021 रोजी भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पर्यावरण व जलसंवर्धन या विषयावर कर्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला पर्यावरण स्नेही श्री अमर दिनकर यांनी पर्यावरण व जलसंवर्धनाचे महत्व सांगून त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांचे PPT वर Presentation

दिनांक १५ व १६ डिसेंबर २०२१ रोजी प्रथम वर्ष B.A.चे प्रथम सेमिस्टरचे विद्यार्थी वर्गातील भूगोल विषयाचे PPT वर लेक्चर देताना

आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

सोमवार दि. 13/12/2020 रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, भूगोल विभाग व स्काय वॉच ग्रुप, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी 5.30 ते 8.30 या दरम्यान आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आकाशात शुक्र, शनी, गुरू, युरेनस, नेपच्युन हे पाच ग्रह एका सरळ रेषेत आले आणि सेरेन व पलास हे दोन लघुग्रह सुध्दा त्याच सरळ रेषेत आले. यापैकी चंद्रावरील विवरे, शुक्र ग्रह, शनीग्रह व त्याचे कडे, गुरुग्रह व त्याचे तीन चंद्र, यांचे टेलिस्कोप द्वारे निरीक्षण करण्यात आले. भूगोल विभागाच्या अनेक विद्यार्थ्यांनी या खगोलीय घटनेचा आनंद अनुभवला.

प्रयास येथे विद्यार्थ्यांचे श्रमदान

25 नोव्हेंबर 2021 रोजी भगतसिंग कोश्यारी यांनी प्रयास सामाजिक संस्था यांनी वृक्ष लागवड व संगोपन या हाती घेतलेला उपक्रमला भेट दिली. या कार्यक्रमाच्या पूर्व तयारी करिता भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छता केली.

दाते कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भूगोल विषयाचे मार्गदर्शन

कोरोना या महामारीच्या काळात विद्यापीठाच्या अनिश्चित काळासाठी लांबलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बाबाजी दाते कला आणि वाणिज्य या महाविद्यालयातील भूगोल विभागाने विद्यार्थ्यांकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भूगोल विषयाचे मार्गदर्शन देण्यास एप्रिल २०२० पासून सुरवात केली आहे.
भूगोल विभाग प्रमुख प्रा. कल्पना देशमुख व त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांना WhatsApp द्वारे भूगोलाच्या PPT पाठवितात. तसेच PPT दाते कॉलेजच्या website वर टाकल्या जातात. Zoom App द्वारा online classes घेऊन मार्गदर्शन केले जाते. याशिवाय फोन च्या माध्यमातून संपर्क करण्या-या विद्यार्थ्यांच्या शंका व शैक्षणिक अडचणींचे निराकरण केले जाते.

मातोश्री वृद्धाश्रमाला भेट

मंगळवार दि.18/2/2020 रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ च्या भूगोल विभाग, BA III च्या विद्यार्थ्यांनी मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली. प्रथम सर्व वृद्धांच्या खोल्या व परिसर स्वच्छ करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वर्गणी करून कचराकुंड्या व केरसुपल्या घेऊन सर्व खोल्यांसमोर ठेवल्या. सर्व वृद्धांना एकत्र करून त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आम्ही आमच्या आयुष्यात आईवडिलांवर वृद्धाश्रमात जाण्याचा प्रसंग येऊ देणार नाही असा निग्रह केला. सोबत डॉ. कल्पना देशमुख व प्रा. शैलजा माथने होत्या.

स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन

दि. 31/01/2020 रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल विभागातर्फे स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.यशवंत राठोड यांनी विद्यार्थ्यांना विविध व्हिडिओ व पी.पी.टी. द्वारे स्पर्धा परीक्षेचे स्वरूप व महत्व, त्याची पूर्व तयारी आणि अभ्यासक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांचा मनातील स्पर्धा परीक्षेची भिती व या क्षेत्रा बद्दलचे गैरसमज याविषयी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून, करिअर निवडतांना आपली आवड, क्षमता व संधी या त्रिसूत्रीचा वापर करून योग्य क्षेत्राची निवड करावी. असे मत प्रा.यशवंत राठोड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.कल्पना देशमुख, प्रा.शैलजा वैद्य व भूगोल अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य आणि विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

'वसुंधरा' या भित्तिपत्रकाचे प्रकाशन

26 जानेवारी 2020 रोजी भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहणाचे प्रकार व यवतमाळ येथून कंकणाकृती सूर्यग्रणाचे विद्यार्थ्यांनी केलेले निरीक्षण या विषयावर तयार केलेल्या 'वसुंधरा' या भित्तिपत्रकाचे प्रकाशन करताना संस्थेचे अध्यक्ष मा. विनायक दाते, विश्वस्थ सुषमा दाते व उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे.

भौगोलिक शैक्षणिक सहलीचे आयोजन

दि.14/1/2020 ला भूगोल विभागा तर्फे रमण सायन्स सेंटर नागपूर येथे भौगोलिक शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले .तारांगण व थ्री डी शो च्या माध्यमातून अवकाश, सूर्यमाला व ग्रहांची माहिती, पृथ्वीचे परिवलन, व परिभ्रमण, चंद्राचे पृथ्वी भोवती फिरणे, चंद्राच्या कला, इत्यादी भौगोलीक माहिती मिळाली. याशिवाय पावसाच्या पाण्याचे नियोजन, वृक्ष संवर्धन, पाणी आडवा पाणी जिरवा यांचे अनेक मॉडेल्स पाहून विद्यार्थ्यांना या समस्या निवारणाची माहिती मिळाली.

विद्यार्थी सूर्यग्रहणाचे निरीक्षण करताना

दि.26/12/2019 रोजीचे कंकणाकृती सूर्यग्रहण यवतमाळ येथून  खंडग्रास प्रकारचे दिसले. जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यामध्ये चंद्र येऊन ते एका सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्रामुळे सूर्य पूर्ण झाकला गेला तर खग्रास, सूर्याचा काही भाग झाकला गेला तर खंडग्रास सूर्यग्रहण होतं. पण अशावेळी चंद्र व पृथ्वी यामधील अंतर जास्त असेल तर, चंद्रबिंबाचा आकार लहान होतो आणि चंद्रामुळे सूर्य पूर्ण झाकला न जाता मधला भाग झाकला जाऊन सभोवताली गोल रिंग प्रकाशित दिसते तेव्हा त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. भूगोल विभागाचे विद्यार्थी सूर्यग्रहणाचे निरीक्षण करताना

मानवी जीवनात भूगोलाचे महत्व

दि. 17/12/19 रोजी 'मानवी जीवनात भूगोलाचे महत्व' या विषयावर भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. संजीव भुयार, भूगोल विभाग प्रमुख चांदूर बाजार.

दाते महाविद्यालयात पाणी परीक्षण कार्यशाळेचे आयोजन

शहरीकरणात होणारी वाढ, वाढती लोकसंख्या आणि औद्योगीकरण याचा विपरीत परिणाम पाण्याच्या स्त्रोतावर होत आहे. आज नद्या, नाले, विहरी, कूपनलिका हे जलस्त्रोत मोठ्या प्रमाणावर दूषित होत आहेत. त्यासाठी योग्य उपाययोजना करणे हेही गरजेचे आहे. याच जाणिवेतुन बाबाजी दाते महाविद्यालयात भूगोल विभागाने पाणी परीक्षण कार्यशाळेचे आयोजन दिनांक १६-९-२०१९ रोजी करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, यवतमाळ चे श्री. विजय गवळी यांनी प्रत्यक्ष प्रयोगातून पाणी परीक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण दिले. पाणी प्रदूषणाची कारणे व त्यातून उदभवणारे आजार या विषयी माहिती देतांना पाण्यातील घटकांची माहिती दिली.
सामाजिक उपक्रम म्हणून भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यानी उमरसरा परीसरातील 40 घरांमधील बोअरच्या पाण्याचे जमा केलेले नमुने श्री.गवळी यांनी पाणी परीक्षण करून त्याचे रिपोर्टस संबधित कुटुंबांना पोहचविण्याची जबाबदारी भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यानी दिली. परिसरातील  जलस्त्रोत दूषित होणार नाही, यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.कल्पना देशमुख यांनी मांडले.

 

दाते कॉलेजमध्ये सीडबॉल निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

जागतिक तापमान वाढ, विकासाच्या निमित्ताने होणारे रस्त्यांचे रुंदीकरण, वसाहत इत्यादि कारणाने कमी होत जाणारे जंगल क्षेत्र, वृक्षकटाई याचा हवामानावर मोठा दुष्परिणाम होतो. प्रचंड प्रमाणात झालेली वृक्षतोड भरून काढणे ही अशक्य बाब आहे. त्याला उत्तम पर्याय म्हणजे सीडबॉल तयार करून ते ओसाड जंगलात फेकणे. ज्या प्रदेशात आपण राहतो तेथील स्थानिक माती, तिथे रुजणार्‍या झाडांची बीज आणि शेणखत इतक्या मर्यादित साहित्यात सीडबॉल तयार होतात.
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथील भूगोल विभागाने दि. २४ ऑगस्ट २०१९ रोजी विद्यार्थ्यांना सीडबॉल तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण कार्यशाळेला भूगोल विषयाच्या विदयार्थ्यांची प्रचंड उपस्थिती होती. सीडबॉल तयार करण्याचे प्रशिक्षण देताना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना सीडबॉल तयार करून दाखविले. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे सीडबॉल तयार करण्याची संपूर्ण माहिती भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.कल्पना देशमुख यांनी दिली. पुढील आठ दिवसात प्रत्येक विद्यार्थ्याने 20 सीडबॉल तयार करून यवतमाळ शहराच्या आजूबाजूच्या उजाड भागात ते फेकणे हा उपक्रम भूगोल विभाग राबविणार आहे. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी साठी प्रा.शैलजा वैद्य, प्रा.यशवंत राठोड व भूगोल अभ्यास मंडळाचे सदस्य तसेच भूगोल विभागाचे सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

रेनवॉटर हार्व्हेस्टिंग कार्यशाळेचे आयोजन

दाते कॉलेजच्या भूगोल विभागाने दि. २१-८-२०१९ रोजी रेन हार्व्हेस्टिंग या विषयावर कार्यशाळा अयोजित केली होती. कार्यशाळेत डॉ. चेतन दरणे यांनी पी. पी. टी द्वारे रेन वॉटर हार्वेस्टिंगची तंत्रशुद्ध सविस्तर माहिती दिली. भविष्यात याची गरज व महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. निखिल परोपटे यांनी प्रयासवन या प्रकल्पा विषयी माहिती देतांना त्याचे नियोजन व यवतमाळ येथे पक्षी अभयारण्य तयार कrण्यासाठी प्रकल्पाचे महत्व स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या आयोजक भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. कल्पना देशमुख यांनी प्रास्ताविक करतांना आयुष्यात एक तरी झाड लावावे, त्यानंतर मनाला जे समाधान मिळते ते प्रत्यक्ष अनुभवा आणि स्वत:ला सिद्ध करण्याची संधी व अभिमान वाटावे असे कार्य तुमच्या कडून घडेल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे होत्या. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांची भरगच्च उपस्थिती होती.
निसर्ग सौंदर्याचे वरदान असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील जंगल, पाणी, आणि अभयारण्ये वाचवण्याची जबाबदारी युवकांवर आहे निसर्गाच्या सानिध्यात आणि स्वच्छ हवेत निरोगी जगायचे असेल, तर पावसाचा प्रत्येक थेंब वाचविला पाहिजे असे विचारमंथन झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष चौधरी व आभार प्रदर्शन आदेश राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.शैलजा वैद्य, प्रा.यशवंत राठोड. भूगोल अभ्यास मंडळाचे सदस्य आणि भूगोल विभागाचे विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

दाते कॉलेज विद्यार्थ्यांचे तासगाव गावी दि. 19 मे 2019 रोजी श्रमदान

यवतमाळ पासून 25 कि.मी. अंतरावरील तासगाव येथे दि. 19 मे 2019 रोजी सकाळी 5.45 ते 10 या वेळात प्रयास सामाजिक संस्था व दाते महाविद्यालयातील भूगोल विभागाचे विद्यार्थी यांनी श्रमदान केले. तासगाव हे केवळ 11 घरांची वसाहत व 80 लोकसंख्या असलेले गाव असून सत्यमेव जयते water Cup स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. येथील सर्व लोक अतिशय जिद्दीने पाणी फाऊंडेशन चे काम करतात. उपजिल्हाधिकारी यवतमाळ, यांनी या गावाला दत्तक घेतले आहे. प्रयास, यवतमाळकर  व भूगोल विभाग या कार्यात सहभागी आहेत.

दाते महाविद्यालयातील प्राध्यापक व भूगोल विभागाचे विद्यार्थी यांचे बरबडा गावी श्रमदान

दि.१६ एप्रिल २०१९ रोजी सत्यमेव जयते पाणी फौंडेशन, वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या बरबडा गावी प्रयास या सामाजिक संघटने सोबत दाते महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व भूगोल विभागाचे विद्यार्थी यांनी श्रमदानात सहभाग घेतला. महाविद्यालयातील १२ प्राध्यापक व भूगोल विभागाचे २४ विद्यार्थी, प्रयास सदस्य व गावकऱ्यांनी मिळून सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत अतिशय उत्साहात श्रमदान केले. पाणी अडविणे व ते जमिनीत मुरविणे, तसेच डोंगरावरील पाणी व माती उतारावरून वाहून जाऊ नये, मातीची धूप होऊ नये म्हणून, मोठे चर खणण्यात आले. प्राध्यापकांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांचा व गावकऱ्यांचाही उत्साह वाढला. वादळ, विजा आणि रिमझिम पावसानेही श्रमदानात हजेरी लावली. आजचे श्रमदान हे बरबडा गावकऱ्यांसाठी वॉटर कप स्पर्धेत बक्षीस प्राप्त झाल्यासारखं आहे. कारण पाण्यासाठी आपण सर्व संघर्ष करीत आहोत आणि निसर्गाने आज आपल्यावर पाण्याचा वर्षाव करून आपल्याला शुभेच्छा दिल्या अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली

श्रमदानाने पावसाच्या पाण्यासाठी दगडी बांधारा
आज दि.11/4/2019 ला दाते कॉलेज व प्रयास सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा, पाणी फाऊंडेशनच्या अंतर्गत भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी बरबडा या गावी जाऊन सकाळी 6 ते 9.30 या वेळात श्रमदान केले. CCD तयार केले उतारावरून पावसाचे पाणी वाहून जाऊ नये म्हणून दगडी बांधारा बांधला. यवतमाळकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, या जाणिवेतून विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात श्रमदान केले.

भौगोलिक शैक्षणिक सहल - २०१८ -१९

दि.१२.०१.२०१९ रोजी भूगोल विषयाची शैक्षणिक सहल यवतमाळ पासून १५५ किमी अंतरावरील समुद्रसपाटीपासून ९४८ मी. उंची असलेल्या सालबर्डी येथे तसेच ऊर्ध्व वर्धा प्रकल्प, कौडण्यपूर व जहांगीरपूर येथे आयोजित करण्यात आली. सहलीला ६३ विद्यार्थी सहभागी झाले तसेच भूगोल विभागप्रमुख प्रा.डॉ.कल्पना देशमुख व प्रा.यशवंत राठोड यांनी सहलीचे आयोजन केले.
सालबर्डी हे मध्यप्रदेशातील बैतुल जिल्हा ता. आठनेर सातपुडा पर्वतराजीत वसलेले, एक निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाण आहे येथे माडु नदीचा उगम होतो. तिला गुप्तगंगा नावानेही ओळखले जाते. सातपुड्याच्या वाळूच्या खडकात माडु या नदीने आपल्या युवा अवस्थेतील विविध भूआकार – धबधबे, धावत्या, रांजणखळगे निर्माण केले आहेत. मोसमानुसार बदलणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे नदी खननाची अनेक भू-वैशिष्ट्ये येथे पहावयास मिळतात. पावसाच्या पाण्याने होणारे रासायनिक विदारण तसेच वृक्षांच्या मुळांपासून होणाऱ्या जैविक विदारणाची अनेक उदाहरणे प्रत्यक्ष पहावयास मिळाल्याने भौगोलिक अध्ययन साध्य झाले.
उर्ध्व वर्धा प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येतो.नल व दमयंती या दोन नावाच्या नद्यांवरून त्याला नल-दमयंती प्रकल्प असे नाव पडले. अमरावती शहर, अमरावती व मोर्शी तालुका येथे या प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो.
कौडण्यपूर हे वर्धा नदी काठी वसलेले एक ऐतिहासिक ठिकाण असून येथे विठ्ठल रुक्मिणीचे प्राचीन मंदिर आहे. ते अमरावती अंबादेवी स्थान पर्यंत भूअंतर्गत भागातून भुयार कोरलेले आहे असे म्हटले जाते. महाभारत काळात श्रीकृष्णाने रुक्मिणीचे येथून हरण केले अशी अख्यायिका आहे. तर जहागीरपूर हे प्राचीन शनी मंदिर आहे.
विद्यार्थ्यांनी या सर्व भौगोलिक ठिकाणांचा अभ्यास करून तेथील भूवैशिष्ट्ये समजून घेतली.  मृदा, हवामान कृषीपद्धती, व्यवसाय इत्यादींचा अभ्यास करून विविध नकाशे, आलेख, आकृत्यांचा वापर करून अहवाल भूगोल विभागाला सादर केला.

अवयवदान जागृतीचा सामाजिक उपक्रम

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ आणि दाते महाविद्यालय भूगोल विभाग  यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जागृतीचा कार्यक्रम दि. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात आला. आधुनिक काळात अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. अवयवदानाने एक व्यक्ती कितीतरी व्यक्तींचे प्राण वाचवू शकते. डोळे, हृदय, यकृत, मूत्रपिंड इतकेच नव्हे तर त्वचेचे देखील रोपण करता येते असे प्रतिपादन वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पॅथोलॉजी असोसिएट प्रोफेसर आणि श्री दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ आर्णी च्या उपाध्यक्ष डॉ. किरण भारती यांनी केले. त्या बाबाजी दाते कला वाणिज्य महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने आयोजित केलेल्या अवयवदान जागृती अभियान कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होत्या.
अवयवदान कोणी करावे या संदर्भात मार्गदर्शन करतांना डॉ. अविनाश जानकर यांनी सुदृढ आणि निरोगी व्यक्तींनाच अवयव दानाची परवानगी असते अशी माहिती दिली. व्यसनी व एड्स सारखा आजार असलेल्या व्यक्तींनी अवयवदान करू नये, ते व्यर्थ जाते. या करिता तरुणांनी व्यसनांचा त्याग करून सुदृढ व निरोगी आयुष्य जगावे. कारण  सुदृढ व निरोगी तरुण तरुणीच देशाची खरी गुंतवणूक असतात असेही मत त्यांनी व्यक्त केले.
भूगोल अभ्यास मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दाते महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रेरणा पुराणिक आणि प्रमुख  अतिथी उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे उपस्थित  होत्या. अवयव दान जागृतीसंदर्भात पॅथोलॉजी असोसिएट प्रोफेसर डॉ.नीलिमा लोढा, डॉ.अविनाश जानकर, डॉ.दिवेकर ,श्री प्रमोद उबाळे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले, कार्यक्रमाच्या आयोजक भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ.कल्पना देशमुख यांनी  प्रास्ताविक  केले. संचलन राहुल सातपुते यांनी केले तर आभारप्रदर्शन शिवम पद्मावार यांनी केले. या कार्यक्रमाला महविद्यालयातील प्राध्यापक व  विद्यार्थी विद्यार्थीनिनी फार मोठ्या संखेने  प्रतिसाद दिला.

मातोश्री वृद्धाश्रमात श्रमदान

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी दि. 29/12/2018 रोजी मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली. श्रमदान करताना आश्रमातील खोल्या व परिसर स्वच्छ करून दिला. विद्यार्थ्यांनी गायलेल्या भाजनांना उत्तम प्रतिसाद देऊन वृद्धांनी गाणी सादर केली. आश्रमातील वृद्धांना आवश्यक वस्तूंचे वाटप केले.

 

 

‘तरुणांनी पौगंडावस्थेतील बदल स्वीकारावेत’ - डॉ. विजय कावलकर व डॉ. विजया कावलकर
पौगंडावस्थेतील मुलींचं भावविश्व, तारुण्यात प्रवेश करतांना होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, भिन्नलिंगी  आकर्षण या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत. या अत्यंत महत्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर प्रयासचे व संजीवनी हॉस्पिटलचे  संचालक डॉ. विजय कावलकर आणि डॉ.सौ. विजया कावलकर यांनी बाबाजी दाते महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींशी दि. १८ डिसेंबर २०१८ रोजी दिलखुलास संवाद साधला. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने ‘ए.बी.सी. ऑफ अॅडोलसंस’  आणि ‘अॅडोलसंस: बायोलॉजीकल अँड फ़िजिओसोशल पर्स्पेक्टीव्ह’ या विषयावर दोन स्वतंत्र व्याख्यानांचे आयोजन केले. या कार्यक्रमात विविध चित्रफितींच्या माध्यमातून मुलींनी त्यांच्यावर  एखादा दुर्धर प्रसंग ओढवल्यास त्याचा सामना कसा करायचा, मुलामुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल कसे स्वीकारायचे, एकमेकांना समजून कसे घायचे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजक भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ. कल्पना देशमुख यांनी प्रास्ताविक करतांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात येणारे हे प्रबोधन तरुणाईच्या कायम स्मरणात राहील असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य सौ.प्रेरणा पुराणिक तर प्रमुख अतिथी म्हणूनसंगाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.विवेक देशमुख लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. यशवंत राठोड, संचलन कु. भक्ती पचगाडे व शिवम पदमावार यांनी तर आभार प्रदर्शन आकाश डहाके व कु.प्रांजली केळकर यांनी केले.

अवकाश निरीक्षण
दि. 14।12।18 ला सायंकाळी 6 ते 8 वाजता, श्री रवींद्र खराबे, अध्यक्ष स्काय वॉच ग्रुप यांच्या दुर्बिणीतून अवकाश निरीक्षण करताना भूगोल विभागाचे विद्यार्थी. चंद्राच्या पृष्टभागावरील विवरे, पर्वतरांगा, सपाट पृष्टभाग जो पृथ्वी वरून हरणाच्या आकाराचा भासतो, यांचे विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले. तसेच पृथ्वीला 24 तासात 16 प्रदक्षिणा मारणाऱ्या स्पेस स्टेशन चे निरीक्षण करता आले.
मंगळ व शनी या ग्रहांचा अभ्यास आणि अवकाश निरीक्षण
दाते कॉलेज भूगोल अभ्यास मंडळ व स्काय वॉच ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळ व शनी या ग्रहांचा अभ्यास  आणि अवकाश निरीक्षण करण्यात आले. स्काय वॉच ग्रुप चे अध्यक्ष - श्री रवींद्र खराबे यांच्या निवस्थानी, बालाजी सोसायटी यवतमाळ येथे रात्री 7 ते 9 या कालावधीत निरीक्षण केले. प्रथम एक तास शनीचे निरीक्षण केले. पश्चिम क्षितिजावर शनीची रिंग स्पष्ट पणे पाहता आली. त्यानंतर शनी क्षितिजाखाली मावळला. पुढील एक तास मंगळ ग्रह, रोहिणी नक्षत्र, राशींचे तारकापुंज व काही ठळक ताऱ्यांचे निरीक्षण केले.

बोअरवेलच्या पाण्याची  तपासणी
दाते महाविद्यालयाच्या सभोवतालच्या परिसरातील, शिवाजी नगर, बालाजी सोसायटी, दहिवलकर ले आऊट, पाटबंधारे विभाग येथील निवडक घरांच्या बोअरवेलच्या पाण्याचे नमुने गोळा करताना व तपासणी अहवाल सादर करताना भूगोल विभागाचे विध्यार्थी.

बाबाजी दाते महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने ‘सेव्ह रिव्हर सेव्ह लाइफ’ या विषयावर आयोजित केली कार्यशाळा
‘नद्यांचे अस्तित्व हाच मानवी सभ्यतेचा पाया आहे. त्यांना सतत वाहते ठेवणे आमचे कर्तव्य आहे हे समजून घेतले नाही तर मानवाचे अस्तित्व धोक्यात येणार आहे’ असा इशारा वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट यवतमाळ चे अध्यक्ष श्री विनायक दाते यांनी दिला. ते  बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने आयोजित केलेल्या ‘सेव्ह रिव्हर सेव्ह लाइफ’ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
‘नदी ही सजीव आहे, तिच्या प्रवाहावर मानवी जीवन अवलंबून आहे याची आम्हा सर्वांना कल्पना असूनही आम्ही आतापर्यंत नद्यांचे शोषण करण्याच्या  पद्धतींचाच  विकास केला. नद्यांचे पुनर्जीवन, पुनर्भरण याकडे आमचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. जलसंपत्ती गटाच्या अहवालानुसार सन २०३० पर्यंत देशात गरजेच्या तुलनेत निम्मेच पाणी असेल. भारताचा २५  टक्के भाग जलद गतीने वाळवंट बनत आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्या मोसमी बनत आहेत तर छोट्या नद्या नष्ट होत आहेत. ३२ प्रमुख शहरांपैकी २२ शहरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे.’ अशी मांडणी श्री प्रवीण व्ह्नाळे आणि नझीर सय्यद या नदी पाणलोट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या  इशा फौन्डेशनच्या मार्गदर्शक तज्ञांनी केली.
या कार्यशाळेतील विचारमंथनातून नद्यांचे प्रवाह आटण्याची कारणीमिमांसा करताना विषयतज्ञांनी स्वतंत्र नियोजनाच्या अभावी नद्यांचे शोषण करण्याचा  ब्रीटीशांचा वारसा जपणे, नदी पाणलोट क्षेत्रातील बेसुमार जंगलतोड, भूजल संसाधनांचे शोषण, लोकसंख्येत चार पटीने झालेली वाढ, नद्यांचे प्रदूषण आणि हवामानातील बदल इत्यादी  मुद्द्यांचा उहापोह केला. नद्यांना प्रवाही करण्यासाठी भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने परिसरातील नद्यांच्या काठावर वृक्ष लागवड करणे, नदीच्या किमान पाण्यावर तिचा हक्क मान्य करण्या संदर्भात जल जागृती करणे, निर्मल पाणी निर्मल जीवन ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे या मुद्द्यां आधारीत कृतीसंकाल्पाचा आराखडा तयार केल्यानंतर कार्यशाळेची सांगता करण्यात आली.
या कार्यशाळेला  महाविद्यालय विकास समितीचे  श्री विजय कासलिकर, वाणिज्य ट्रस्ट च्या सदस्य सौ. सुषमा दाते, प्राचार्य प्रेरणा पुराणिक, भूगोल विभाग प्रमुख डॉ. कल्पना देशमुख सिनेट सदस्य प्रा. विवेक देशमुख भूगोल अभ्यास मंडळाचे सदस्य व भूगोल विभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर  उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मयुरी गोडसे हीने तर आभार प्रदर्शन राहुल सातपुते यांनी केले.

बाबाजी दाते महाविद्यालयात सिडबॉल निर्मिती कार्यशाळा

यवतमाळ : गेल्या पन्नास वर्षातील भीषण असा दुष्काळ यवतमाळ जिल्ह्याने यावर्षी अनुभवला आहे. त्यातच या वर्षी सिमेंट रस्त्यांच्या बांधकामामुळे रस्त्यांच्या बाजूची हजारो झाडे कापली गेली.भरपूर पावसासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन अत्यावश्यक झाले आहे. या कार्यात सरकारी योजना शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थि विद्यार्थिंनिंचा देखील  सहभाग असावा या उद्देशाने  येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयच्या भूगोल विभागाने ‘सिडबॉलची निर्मिती’ या महत्वाच्या विषयावर दि. 08 सप्टें. 2018 रोजी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली.

या कार्यशाळेला महाराष्ट्र शासन वनविभागाच्या आर.एफ.ओ श्रीमती कौशल  रंगारी तसेच भारती महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या प्रा.डों.रूपाली टेकाडे यांनी मार्गदर्शन केले.ज्या परिसरात वृक्ष लागवड करावयाची आहे त्या परिसरातील वस्त्रगाळ केलेली माती,शेणखत यांचे मिश्रणात उपयुक्त आणि औषधी वनस्पतींचे विशिष्ट पद्धतीने बिजरोपण करून त्याचे सिडबॉल तयार करण्यासंदर्भात या तज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. दोन सत्रातील या कार्यशाळेत तयार करण्यात आलेले सिडबॉल ज्या ठिकाणी टाकले जातील त्या ठिकाणी ही रोपे उगवतील अशापद्धतीने तयार करण्याचे प्रशिक्षण सहभागी विद्यार्थ्यांना देण्यात आले.

कार्यक्रमाच्या आयोजक भूगोल विभाग प्रमुख प्रा. डों कल्पना देशमुख प्रशिक्षणार्थ्यांनी या शास्त्रीय पद्धतीने सिड बॉल तयार करून ते माळरानावर, ज्याठिकाणी झाडे नाहीत अशा ठिकाणी तसे बाहेरगावी जाणेयेणे करणार्‍या विद्यर्थ्यांनी बस मधून ठिकठिकाणी टाकावे असे आवाहन केले.अशापद्धतीने केलेले वृक्षरोपण हमखास यशस्वी होते असा ठाम विश्वास कार्यशाळेतील तज्ञांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाला बाबाजी दाते महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डों. माणिक मेहरे,भूगोल विभागाचे प्रा. यशवंत राठोड, चित्रा राऊत, प्रा. शैलजा वैद्य व इतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन कु. भक्ती पचगाडे हिने तर आभार प्रदर्शन   हितेश केळकर या विद्यार्थ्याने केले.

अंतराळातील ग्रहांविषयी सजग व्हा

बाबाजी दाते महाविद्यालयातील भूगोल अभ्यासमंडळाच्या उद्घाटन प्रसंगी खगोलशास्त्र अभ्यासकांचे आवाहन  ‘सूर्यमालेतील शनी व मंगळा सारखे ग्रह पृथ्वी पासून लक्षावधी की.मी. अंतरावर आहेत. आपल्या आयुष्यातील छोट्या मोठ्या घटनांवर त्यांचे अनिष्ट परिणाम होत नसतात’, हे वैज्ञानिक सत्य खागोलोशास्त्राचे अभ्यासक श्री रवींद्र खराबे यांनी व्यक्त केले. श्री खराबे बाबाजी दाते कला आणी वाणिज्य महाविद्यालयाच्या भूगोल अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. चंद्र आणि सूर्याची ग्रहणे हा सावल्यांचा खेळ असून तो पृथ्वी आणी चंद्राच्या परिभ्रमणामुळे होतो. ग्रहणाबद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी  भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी बाबाजी दाते महाविद्यालयातील भूगोल अभ्यास मंडळाने सूर्यमालेची अभ्यासपूर्ण माहिती देणारा स्लाईड शो आयोजित केला होता.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना भूगोल विभागप्रमुख प्रा डॉ. कल्पना देशमुख यांनी ‘भूगोल हा केवळ चार भिंतींमध्ये शिकविण्याचा विषय नसून त्याची व्याप्ती आणी आवाका मोठा आहे’ असे मत व्यक्त केले. त्यांनी भूगोल विभागाद्वारे वर्षभरात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी भूगोल अभ्यास मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अभ्यास मंडळाचे अध्यक्षपदी राहुल सातपुते, उपाध्यक्षपदी शिवम पद्म्मावार, सचिव सायली मानतूटे आणी १२ सदस्यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटक वाणिज्य न्यासचे उपाध्यक्ष श्री सतीश फाटक होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रेरणा पुराणिक यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी उपप्राचार्य प्रा. डॉ.माणिक मेहरे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा. यशवंत राठोड, प्रा.चित्रा राउत, प्रा.शैलजा वैद्य व अभ्यास मंडळाचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला भूगोल विषयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनिंनी मोठ्या संखेने उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला.