युवक महोत्सव ९ ते ११ जानेवारी २०१८

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे दि. ९, १० व ११ जानेवारी २०१८ या कालावधीत युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.राजेश जयपूरकर उद्घाटक म्हणून उपस्थित होते. वाणिज्य महाविद्यालय न्यासचे अध्यक्ष मा.विनायक दाते यांच्या अध्यक्षते खाली विद्द्यार्थ्यांच्या प्रचंड उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. वाणिज्य महाविद्यालयाचे उपाध्यक्ष मा.सतीश फाटक, न्यासच्या सदस्य सौ.सुषमा दाते, श्री मंगेश केळकर, सौ मीरा केळकर, सौ.शर्मिला फाटक, श्री विजय कासलीकर, चद्रकांत रानडे, प्राचार्य प्रेरणा पुराणिक, वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व एम.सी.व्ही.सी.चे प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मा.प्र-कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वर्ग १२ वी मध्ये यवतमाळ जिल्ह्यातून गुणानुक्रमे प्रथम आलेली कु.भक्ती जोशी, राष्ट्रीय सेवा योजनेतून मुंबई येथे २६ जानेवारी च्या आर.डी. परेड साठी निवड झालेली कु.गायत्री माने, थलसैनिक कॅम्पसाठी दिल्ली येथे निवड झालेला एनसीसी कॅडेट मनोज भेंडारकर या विद्यार्थ्याना गौरवण्यात आले.
याप्रसंगी विवध क्षेत्रात कर्तुत्व गाजवणाऱ्या प्राध्यापकांचा देखील गौरव करण्यात आला. या मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून आलेले प्रा.विवेक देशमुख, अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या आर्चरी टीमचे नेतृत्व करणारे डॉ.रविजीत गावंडे, उत्कृष्ट एनसीसी युनिट म्हणून प्रा.प्रशांत बागडे, पी.एचडी.मार्गदर्शक झाल्याबद्दल डॉ.स्नेहल डहाळे यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

या तीन दिवसीय स्नेहसंमेलनात रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, डीश डेकोरेशन, या स्पर्धांना विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भरभरून प्रतिसाद दिला. याशिवाय काव्यगायन, नृत्य स्पर्धा, वेशभूषा, भावगीत स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धा,. बचाव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दि ९ व १० जानेवारी रोजी दुपारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नृत्य, नाटिका, नकला, वेशभूषा, ट्वीन्स अशा विविधरंगी स्पर्धांना सुरवात झाली. या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी भरगच्च उपस्थिती दर्शवली, या सर्व कलाकारांना मनसोक्त दाद देताना विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.युवक महोत्सवाचा उत्तरार्ध आनंदमेळ्याने झाला. विविध खेळ आणि रुचकर खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर आस्वाद घेण्यासाठी खवैयांची झुंबड उडाली. या सर्व विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी विद्यर्थीनिनी चढाओढीने सहभाग नोंदविला. सुमारे ८६  स्पर्धकांनी  बक्षिसे पटकाविली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.

२०१८ च्या या युवक महोत्सवाच्या समन्वयक भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. कल्पना देशमुख होत्या. मा. प्राचार्य डॉ. प्रेरणा पुराणिक यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व संस्थाचालकांचा सक्रीय सहभाग, कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन आणि प्राध्यापकांचे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण नियंत्रण  याबरोबरच  विद्यार्थ्यांची अलोट गर्दी, उस्फुर्त प्रतिसाद, अमाप उत्साह हि वैशिष्ट्ये असलेल्या या युवक महोत्सवातील शिस्त वाखाणण्यासारखी होती या गोष्टींचा सर्व प्रमुख अतिथींनी केलेला उल्लेख ही या महोत्सवाची आणखी एक जमेची बाजू.

Top